डेस्टिनेशन किल्ले डहाणू
May 1, 2009 Leave a comment
– श्रीपाद भोसले
ऊन्हाच्या झळा चुकवत फिरायला जायचं असेल, तर निसर्गरम्य डहाणूला भेट द्यायला हवी. उन्हाळ्यात फिरायला जायचं म्हणजे ऊन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांपासून सुटका नसते. पण, तरीही फिरायला जायचं असेल, तर फार लांब जायला नको. ठाणे जिल्ह्याला लाभलेल्या विस्तीर्ण किनाऱ्यावरचा गारवा अनुभवता येईल. ठाण्यातलं, खाडी समुदाने वेढलेलं एक निसर्गरम्य ठिकाण म्हणजे डहाणू. ठाण्याच्या उत्तरेकडचा शेवटचा सागरी किल्ला म्हणजे किल्ले डहाणू. सागर किनाऱ्यावर डौलाने नांगर टाकून उभ्या असलेल्या होड्या आणि त्यावर फडकणारे लाल, पिवळे, हिरवे झेंडे… संपूर्ण किनारपट्टी, नारळी-पोफळीच्या झाडांनी व्यापली आहे. डहाणू किल्ल्याकडे जाण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या डहाणू रेल्वे स्थानकावर उतरायचं. गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या मेल किंवा शटल एक्स्प्रेसही इथे थांबतात. डहाणू हे तालुक्यातलं प्रमुख ठिकाण असल्याने बससेवाही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. डहाणू गावात गेलं की डाव्या हाताला प्रशस्त डांबरी सडक गेलेली दिसते. या चौकातच वडाच्या झाडाच्या डाव्या बाजूने डांबरी सडकेने चालत गेलं, की वीस मिनटांत किल्ला गाठता येतो. गड प्रवेशद्वारावर पोहोचताच थोडा अचंबा वाटतो. कारण आजही इथे पोलिस तैनात असलेले दिसतात. इसवी सन १००च्या सुमारास नाशिक इथे कोरलेल्या सहस्त्ररश्मी गुंफेमधे नहापन राजाचा जावई उहापन याने कोरलेल्या शिलालेखात डहाणू किल्ल्याचा उल्लेख आढळतो. सध्या गडावर तहसीलदार कार्यालय आणि पोलिस कोठडी आहे. प्रवेशद्वारावरच एक तोफ आपलं स्वागत करते. गडप्रवेश केल्यावर डाव्या हाताच्या पायऱ्या गडाच्या ध्वजस्तंभाकडे जातात. इथून आसपासचा बराच परिसर न्याहाळता येतो. वडाच्या झाडांनी तटबंदीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. पायऱ्यांच्या बाजूने एक वाट खाली गेलेली दिसते, ते आहे गडाचं दुसरं प्रवेशद्वार. ही वाट थेट वस्तीत जात असल्याने या प्रवेशद्वाराला कुलुप लावण्यात आलं आहे. गडाची बरीच पडझड झाली असली तरी इथल्या देवीची पूजा मात्र रोज होते. गडावर छोटेखानी विहीर आहे. तिचं पाणी आजही वापरण्यायोग्य आहे. गडावर सतराव्या शतकाच्या सुमारास लोखंडाच्या आणि पंचधातूच्या तोफा असल्याचा उल्लेख आहे. गडावर काही पोर्तुगीज सैन्य आणि इसाई कुटुंबं राहत होती. गुजरातच्या राजासह इसवी सन १५३३ मधे झालेल्या तहात पोर्तुगिजांनी व्यापारासाठी डहाणू बंदर ताब्यात घेतलं, तर राजषीर् रामोजी शिंदे यांनी ११ जानेवारी १७३९ रोजी डहाणू शिताफीने जिंकला. पुढे काही काळ हा किल्ला इंग्रज आणि पुन्हा मराठ्यांकडे आला. अखेर १८८८ मधे या किल्ल्याचं पोलिस कचेरीत रुपांतर झालं. ठाणे जिल्ह्यात अशा अनेक ऐतिहासिक वास्तू सागर किनाऱ्यावर गिर्यारोहकांसोबत पर्यटकांचीही वाट पाहत आहेत.