टेक केअर दोस्त


हाय…

पाऊस मुक्कामी आलाय! पण काही म्हणा, आपल्या शहरांतल्या पावसाला गर्दीचा एक तक्रारखोर आवाज असतो. इथे तो भेटतो तेव्हा लेट झालेल्या ट्रेनच्या गर्दीत शिव्या खात असतो किंवा रस्ते तुंबवून गुडघाभर साचलेल्या पाण्यात रिपरिप करत आपल्याला चिडवत राहतो…या पावसाला सरळ टांग मारायची. वीकेण्डला सॅक पाठीवर टाकायची. कॅमेरा लटकवायचा. रेनीवेअर अडकवायचं, कंपूला फोनाफोनी करायची, लोकलच्या वेळा नीट बघायच्या, नाहीतर सरळ गाडी काढायची आणि पावसाला भेटायला रानात जायचं….अस्साच प्लॅन करताय ना? पण मंडळी, या मान्सून पिकनिकपूर्वी लेट मी शेअर वन थिंग.

आमच्याच ऑफिसमधला तो ग्रुप. वेगळ्या सेक्शनमधला. पाऊस सुरू झाल्याबरोबर त्याला सलामी द्यायला सगळ्यांनी कोकणात जायचं ठरलं. रात्रीचा प्रवास करुन सकाळी सगळे तिथं पोहोचले. नदीचं खळाळतं पाणी आणि हिरवाकंच निसर्ग यांनी वेड लावलं सगळ्यांना. कुणाचीही वाट न पाहता तो तर धावलाच पाण्याकडे. कपडे काढून थेट पाण्यात. भय नव्हतंच , कारण तो पट्टीचा पोहणारा. उडी मारली ती थेट तळाशीच. वर्षानुवर्षांचा गाळ पोटात साठवलेल्या नदीने त्यालाही अलगद पोटात घेतलं. हातपाय हलवले असतील खूप. वर यायची धडपडही केली असेल, पण खोल रुतत गेला तो. मित्र धावले. कुणी पॅनिक होऊन उड्या मारल्या नाहीत हे नशीब. गावकऱ्यांना बोलावलं. बराच वेळ शोधाशोध केली. सापडला नाहीच. रात्री शोध थांबवावा लागला. दुसऱ्या दिवशी सापडला, डोळे माशंनी खाल्ले होते…खूप भेसूर दिसत होता म्हणे…आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. चोवीस वर्षांचा.

पाऊस वाढेल, तसतशा बातम्या येत राहतील. आपण वाचू. माहितीचं कुणी असेल तर तात्पुरते हळहळू. पाच मिनिटं अस्वस्थ होऊ आणि सोडून देऊ. आपली पिकनिक प्लॅन करताना हे कुणाच्या ध्यानातही राहणार नाही.

पाण्याचं आदिम आकर्षण असतंच आपल्या सगळ्यांमध्ये. कदाचित आपण पाण्यामधून उत्क्रांत झालो आहोत म्हणून असेल, जन्माला येण्यापूवीर् नऊ महिने पाण्यातच वाढलो म्हणून असेल किंवा शरीरात नव्वद टक्के पाणी घेऊन वावरतो म्हणून असेल. या आकर्षणातूनच पाण्याकडे ओढले जातो आपण. हिरव्या डोंगरावरून फेसाळत कोसळणाऱ्या शुभ्र धबधब्यांखाली भिजणं, चिंब पावसांत समुदाच्या लाटांशी मस्ती करणं, तुडुंब वाहणाऱ्या खळाळत्या गढूळ नदीला आव्हान देणं…हे सगळं उसळत्या तरुणाईला खुणावणारं असतंच, पण बहुतेक वेळा धबधब्यांपर्यंत पोहोचेपर्यंत कडेकपारीतून चालताना सैल झालेली एखादी दरड तुमच्यासह पात्रात कोसळू शकते. खूपदा पाणी दिसतं शांत पण अंदाजापेक्षा ते प्रचंड खोल असतं. कुठे याच शांत पाण्याखालचे भोवरे अशा वेगाने खाली खेचतात की परत नखही दृष्टीला पडू नये. या दिवसांत समुद्रही मित्र राहत नाही, अनोळखी होऊन जातो. जीवदायिनी नदी जीवघेणी होते. कितीही पट्टीचे पोहणारे असाल तरी अशावेळी फालतू आत्मविश्वास न ठेवलेलाच बरा. ज्या ठिकाणाविषयी काहीही माहिती नाही अशा ठिकाणी जीवघेणं साहस करायलाच पाहिजे का? पुष्कळदा किनाऱ्यांवर ते ठिकाण पोहण्यासाठी किती धोकादायक आहे. गेल्या काही वर्षांत किती लोकांनी प्राण गमावले, याची आकडेवारी लिहिलेला बोर्ड असतो, पण त्याच्याकडेही सोयीस्कर दुर्लक्ष करतो आपण. बरं आपण निवडलेली ठिकाणंही इतकी आतल्या भागात असतात की आराडाओरडा करूनही मदत मिळण्याची शक्यता नसते. मिळाली तरी पुष्कळदा मृतदेह वर काढण्याच्या वेळी ती पोहचते.

आणखी एक गोष्ट. ट्रीप प्लॅन करताना ड्रिंक्सचा क्रेट कुणी आणायचा हे पण ठरतं का तुमच्यात? एंजॉय करण्याच्या व्याख्येत हे असू नये असं म्हणून तुमचा मूड खराब करणार नाही. पण दारू पिणं ही चार भिंतींच्या आत बसून करायची गोष्ट आहे असं नाही वाटत तुम्हाला? मस्त पाऊस पडतोय. सोबत जीवलग दोस्तमंडळी आहेत. निसर्ग त्याचं वैभव तुमच्यासमोर खुलं करून बसलाय. ही नशा पुरेशी नाहीये? पावसाळी सहलीसाठी आपल्यासारखीच कुटुंबही बाहेर पडतात. आपण आरडा ओरडा करत नशेत अचकटविचकट बोलत असतो, तेव्हा बायका, लहान मुलं, वयस्क माणसं यांनी तिथं मिनिटभरही थांबू नये असा माहौल असतो. कमरेला नावापुरतं वस्त्रं. हातात बाटली नाहीतर कॅन, अचकट विचकट अंगविक्षेप, अर्वाच्य भाषा हेच तरुणाईचं इंप्रेशन व्हावं असं वाटतं तुम्हाला? खूपदा किल्ल्यांवर जातो आपण पाऊस एंजॉय करायला. इतिहास घडवायला आपल्या पूर्वजांनी रक्त सांडलेलं असतं तिथं बाटलीतून हिंदकळणारी दारू सांडायची? ‘हर हर महादेव’च्या गर्जना झाल्या तिथं चिअर्सचा घोष करायचा?… जस्ट थिंक फ्रेंड्स. अशा तरंगत्या अवस्थेतच अपघातांची शक्यता कैक पटीने वाढते. तासाभराची कैफ आयुष्यातून उठवू शकतो. तेव्हा भान विसरून एंजॉय करू या पण बेभान नाही व्हायचं हेही ठरवू या.

आयुष्य इतकं स्वस्त नसतं दोस्त! अशा सहलीतच नव्हे तर नेहमीच हे डोक्यात असायला हवं. लोकलच्या गर्दीत एका हाताने लोंबकळताना, हेल्मेट शिवाय सुसाट बाइक हाकताना, एक्स्प्रेस वेवरून जाताना स्पीडोमीटरच्या काट्याला थकवताना…नेहमीच. आई वडिलांचा जीव असतो तुमच्यात. कुणीतरी जन्मोजन्मीची गाठ मारून आयुष्य जोडलेलं असतं तुमच्याशी. मित्रांच्या हृदयात जागा असते तुमची, डोळे तुमच्या वाटेवर अंथरून ‘पपा काय आणलं’, म्हणत चिमुकले हात पसरून कुणीतरी वाट बघत असतं तुमची. तुम्ही पाहिलेलं आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न अर्ध्या वाटेवर तुमच्या प्रतीक्षेत असतं… सो बी केअरफुल.

नाऊ प्लान आऊट द थिंग अँड एन्जॉय . मग कुठे जाताय या वीकेण्डला? कळवा.

हॅव अ हॅपी अॅण्ड सेफ मॉन्सून पिकनिक. टेक केअर दोस्त!

ओम भवती भिक्षांदेही !

भारताचा चेहरा जगासमोर कसा आहे ? हे घरबसल्या जाणून घेण्याचे इंटरनेट हे एक सोपे माध्यम. वेगवेगळ्या वेबसाईटवर दिलेल्या माहितून भारत कसा आहे किंवा विभिन्न क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निरक्षणातून भारताचे वर्णन व्यक्तिगत ब्लॉगमध्ये कशाप्रकारे नोंदले आहे ? हे जाणून घेण्याचा प्रयत्न भारताविषयी अनोखी माहिती समोर आणतो. आपलाच देश आपल्याला अनोळखी वाटू लागतो. मात्र, भिकारी- भिखारी आणि बेगर्स यांच्याविषयी इंटरनेटवर माहिती शोधत असताना “भारत हा भिकाऱ्यांचा देश आहे आणि तेथे भिकाऱ्यांपासून सावध राहण्यासाठी पुढील टिप्स लभात ठेवा’ असे जेव्हा वाचनात आले, तेव्हा अस्वस्थ झालो. त्याच मनःस्थितीत नोंदलेल्या इतरही माहितीचा या “दखल’ मध्ये उहापोह…

जळगावचे प्राध्यापक डॉ. सुनील मायी यांचे “आलो जन्मभरी मागाया’ हे छोटेखानी पुस्तक साधारणतः सहा महिन्यांपूर्वी वाचनात आले. भिकाऱ्यांच्या विषयी त्यांनी केलेल्या निरीक्षणांची नोंद त्यात आहे. भिकाऱ्यांचे तीन- चार इरसाल कॅरेक्‍टर लेखकाने उभे केले असून, सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या सर्वच प्रकारच्या भिकाऱ्यांचे प्रातिनिधीक चित्रण त्यात आहे. वेगळ्याविषयावरील रंजक माहिती असल्यामुळे पुस्तक पटकन वाचून संपले. त्यानंतर या विषयाचा विसर पडला. “भुसावळमध्ये भिकाऱ्यांची संख्या वाढली’ अशी बातमी तीन- एक महिन्यापूर्वी वाचनात आली. या भिकाऱ्यांमध्ये “गर्दूल्ले’ जास्त आहेत, असाही संदर्भ होता. पुन्हा विषय स्मृतीबाहेर गेला.
इंटरेटवर विविध विषयांची माहिती शोधण्याची मला सवय आहे. एकेदिवशी सहज भिकारी- भिखारी आणि बेगर्स हे शब्द गुगलवर ऑपरेट करुन माहितीचा शोध घेतला. समोर आलेल्या वास्तवाने उडालोच. प्रवासी आणि पर्यटनाशी संबंधित अनेक वेबसाइटची यादी समोर आली. भिकारी आणि पर्यंटनाचा काय संबंध ? उत्सुकता वाढली. “भारतात पर्यटनाला जाता आहात ?’ असा प्रश्‍न करीत पर्यटकांनी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी या विषयी या वेबसाईटवर अनेक टिप्स दिलेल्या होत्या. त्यात भारतातील भिकाऱ्यांपासून सावध ! असा इशारा नोंदलेला होता. इंडिया ट्रॅव्हल टिप्स, वर्ल्ड ऑफ इंडिया आणि इंडिया डॉट ट्रॅव्हल डॉट एजन्ट डॉट कॉमवर या टिप्स वाचता आल्या.या तीनही वेबसाईटवर भिकाऱ्यांपासून सावध राहण्याच्या 5 ते 7 टिप्स होत्या. भारतात अपंग वृद्ध- महिला- मुले भिक मागतात मात्र काही देखावा करतात,उपाशी मुले दाखवून भिक मागणाऱ्या महीला असतात, वाहनातून उतरल्यावर लगोच काही देवू नका तर परत जाताना द्या, मुलांना भिक देतांना बावनासील होवू नको कारण त्यांचे पालकच त्यांना तसे करण्यास सांगतात, मुलांना रोख स्वरुपात भिक देवू नका कारण पालक ती हिसकावून घेतात, काही करावेसे वाटलेच तर स्वयंसेवी संस्थांना मदत करा अशा अनेक टिप्स वाचनात आल्या. भारताच्या पर्यंटन विषयक आणि समाजिक चेहऱ्याचे विद्रुपिकरण या वेबसाईटच्या माध्यममातून कसे होत आहे ? असा प्रश्‍न मनांत निर्माण झाला. त्यावेळी प्रा. श्री. मायी यांच्या पुस्तकातील अनेक निरीक्षणे आठवली. मंदिर, रेल्वेस्थानक, बसस्थानक, बाग- बगिचे अशा सार्वजनिक ठिकाणी दिसणाऱ्या भिकाऱ्यांची गर्दी आठवली. या ठिकाणांशी भारतीय पर्यटनस्थळे थेट संबंधित आहेत, त्यामुळे तेथे दिसणारा भारत वेबसाईटच्या माध्यमातून व्यक्त होतो हे लक्षात आले. कामत डॉट कॉम या ब्लॉगवरही भिकाऱ्यांच्या विषयी अशीच मात्र, भारतीय संस्क
ृतीचे चुकीचे दर्शन घडविणारी माहिती आढळून आली. लेखकाने अत्यंत अर्धवट माहितीवर निरीक्षण नोंदविले आहे. तो म्हणतो, “भारतात भिकारी परंपरेने तयार होतात. हिंदू साधू होण्यासाठी प्रथम भिक मागता आली पाहिजे’. ही माहिती सुद्दा चेहरा बिघडवणारीच वाटते.
भारतातील तपस्वी, विद्वान साधू- महंतांच्या प्रतिमांना छेद देणारे हे लेखन अस्वस्थ करते. भारतीय संस्कृतीत “भिक्षा मागणे’ हा सुद्धा एक संस्कार आहे, याची माहिती कोणीतरी असा अर्धवट लेखकांना द्यायला हवी. अध्ययन करणारा ब्रह्मचारी आणि सर्व सुखांकडे पाठ फिरवणारा संन्याशी यांना पोटापुरती भिक्षा मागण्या हक्क संस्कृतीने मान्य केला आहे. गुरूदक्षिणा देण्यासाठी विद्यार्थी, विवाह- यज्ञ किंवा आई- वडील यांच्या पोषणासाठीही भिक्षा मागणे योग्य मानले गेले आहे. आपले दैन्य घालविण्यासाठी राजा किंवा धनिकाकडे याचना करण्यासही संस्कृतीची मान्यता आहे. उपनयन संस्कार (मौंज) करताना आचार्यांनी बटूला ब्रह्मश्‍चर्याविषयी उपदेश केल्यानंतर मातेकडे बटूने भीक्षा मागण्याचाही संस्कार केला जातो. पहिल्या भिक्षेवरही आचार्यांचाच अधिकार असतो. भारतीय संस्कृती दर्शनातील या बाबीही ठळकपणे समोर मांडल्या गेल्या पाहिजेत. याचा अर्थ या प्रथा- परंपरांचे समर्थन करण्याचा हा किंवा त्या योग्यच असल्याचा दावा करण्याचा येथे प्रयत्न नाही हेही येथे स्पष्ट व्हावे. खरेतर भारतीय संस्कृती कोषात “भिक्षा’ शब्दाची व्याख्या अत्यंत समर्पक शब्दांत दिली आहे. तेथे तर्कतीर्थ म्हणतात, शरीर धडधाकट असूनही लोकांकडे अन्न, वस्र, पात्र, द्रव्य याची याचना करणे म्हणजे भिक्षा मागणे.
इंटरनेटवर “भिकारी’ विषयावरील शोध मोहिमेत आणखी काही वेगळे संदर्भ आढळले. भारताची राजधानी असलेल्या नवीदिल्लीत सन 2007 मध्ये भिकाऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. तेथे लाखभर भिकारी आढळले. त्यापैकी 4 पोस्ट ग्रॅज्युएट, 6 पदवीधर, 796 बारावी उत्तीर्ण होते. एकूणपैकी 799 पुरूष व 1541 महिला शरीरिकदृष्ट्या पूर्णतः धडधाकट होत्या. यातील काही भिकाऱ्यांचे रोजचे उत्पन्न (कमाई ?)500 रुपये होती.
ंमधील भिकाऱ्यांच्या संदर्भात अशीच एक आकडेवारी लक्षवेधून गेली.सन 2004 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात नवीदिल्लीत 60 हजार, मुंबईत 3 लाख, कोलकत्यात 75 हजार, बंगळूरमद्ये 56 हजार भिकारी आढळले. हैदराबाद महानगराच्या बाबतीत असा निष्कर्ष आहे की तेथे दर 375 माणसांच्या पाठीमागे एक भिकारी आहे…आता बोला. हीच गंमत मुंबईच्या संदर्भात आहे. 1996 मध्ये तेथे 20 हजार भिकारी होते, आज तेथे 6 लाख भिकारी आहेत. मुंबईत भिकाऱ्यांच्या माध्यमातून वार्षिक किती रुपयांची उलाढाल होते ? याची आकडेवारीही राज्यशासनाने जाहीर केली आहे आणि तो आकडा आहे…180 कोटी मात्र. सांगली पोलिस दरवर्षी भिकाऱ्यांसाठी दिवाळी साजरी करतात.
काही श्रीमंत भिकाऱ्यांच्याही नोंदी आढळल्या. अहमदाबाद येथे एका भिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या झोपण्याच्या कापडात 44 हजार रुपये कॅश मिळाली होती. तेथेच भद्रकाली मंदिराजवळची एक भिकारी महिला नातवास खर्च करण्यासाठी रोज 50 रुपये देत होती. सांरगपूरच्या एक भिकाऱ्यांने समाजिक कार्यात सव्वालाखांची देणगी दिली होती.
हे सारे संदर्भ वाचताना गंमत वाटत होती. भिकारी हे भारतीय समाजाचा अविभाज्य भाग आहे हे मान्य केले तरी, विदेशी पर्यटकांना त्यांच्या रुपात भारताची ओळख होत आहे या विषयी खेदही वाटत होता. पुन्हा प्रा. श्री. मायी पुस्तकातील एक सूचना मार्गदर्शक वाटली. ती म्हणजे, महानगरांमध्ये भिकाऱ्यांसाठी “बेगर्स होम’ उभारले गेले पाहीजेत. जळगावमध्येही या सूचनेवर महापालिका व स्वयंसेवी वेगळा विचार करायला काय हरकत आहे ?

सदराशी संबंध नसलेली गोष्ट

एका आयटी कंपनीच्या समोर भिक मागणाऱ्या भिकाऱ्यास त्या कंपनीतील बडा अधिकारी 50 रुपयांची नोट देत असे. भिकारी त्याला हसून नमस्कार करायचा. काही महिन्यांनी त्या अधिकाऱ्यांने 50 ऐवजी 20 ची नोट देणे सुरू केले. भिकारी ती नोट घ्यायचा आणि केवळ स्मित करायचा. पुन्हा काही महिन्यांनी त्या अधिकाऱ्यांने त्या भिकाऱ्यास 10 रुपयांची नोट देणे सुरू केले. त्यावर निर्विकारपणे भिकारी त्या अधिकाऱ्यांस म्हणाला, “महाशय आपण काही अडचणीत आङात का ? आपण मला कमी रकमेची नोट देत आहात ?’ तो अधिकारी म्हणाला होय, “पूर्वी माजे खर्च कमी होते. आता, माझा मोठा मुलगा उच्च शिक्षणाला गेला म्हणून मी 50 ऐवजी 20 रुपये देत होतो. त्यानंतर मुलगी कॉंलेजात गेली. तीचा खर्च वाढला म्हणून मी तुला 10 रुपये देत आहे’ तो भिकारी निर्विकारपणे म्हणाला, “तुम्हाला अजून तिसरे मूल आहे का ?’ अधिकारी म्हणाला, “होय. एक लहान मुलगा आहे.’ त्यावर भिकारी परखडपणे म्हणाला, “महाशय, या तिसऱ्या मुलाचे शिक्षण मला देण्याच्या रकमेतून कृपया करु नका’.

original at -http://marathiblogs.net/node/44893


रानात, फुलात; कोकणच्या गावात!

हातात रिझव्हेर्शन, तारांकित हॉटेलातील बुकिंग, ठरीव न्याहरी-जेवण आणि प्रेक्षणीय स्थळे किंवा रिझॉर्टमधील तेच वातावरण…यांच्या बाहेर पडून स्वत: सहल आखून कोकणासारख्या हिरव्यागार प्रांतात जाण्याचा अनुभव घ्यायला हवा. तिथल्या एखाद्या छोट्याशा गावात, निसर्गाच्या सान्निध्यात मुलांना काही दिवस राहायला मिळणे आणि सर्वांनी मिळून समूहजीवनाचा अनुभव घेणे, यातली मजा काही औरच…

………..

मे महिन्याच्या भल्या मोठ्या सुटीत करायचं काय, या मुलांना आणि त्यांच्या पालकांना पडणारा प्रश्ान्च असतो. दहावीत आणि बारावीत जाणाऱ्या मुलांना तर आता मे महिन्याची सुटी असते, असे आपण म्हणतच नाही. त्यांचा लगेच अभ्यास सुरूही होतो. पण इतर मुलांपैकी काही जातात छंद वर्गात. काही सचिन तेंडुलकरच्या फोटोच्या पाया पडून, कीटचे ओझे सांभाळत मैदानावर जातात. काही लिटल चॅम्प होण्याचे स्वप्न उराशी बाळगून गाणे शिकायला जातील. अर्थात, हे सारे न करणारीही हजारो मुले असतातच.

काही कुटुंबांमध्ये आता विचार सुरू होईल बाहेरगावी जाण्याचा. एखाद्या सहल कंपनीमध्ये भरभक्कम पैसे मोजून आठ दिवसांसाठी जायचे. ते ही घरातल्या तिघांनी किंवा चौघांनी. मात्र, अशा सहलींमध्ये जी प्रेक्षणीय स्थळे मोठ्या माणसांना बघायची असतात, ती पाहण्यात लहानग्यांना अजिबातच रस नसतो. त्यामुळे त्यांची रड, कंटाळा, धुसफूस सांभाळत; कधी त्यांना रागावत तर कधी प्रेमाने समजावत सगळ्यांबरोबर दिवसभर फिरत राहायचे आणि रात्री तारांकित हॉटेलात डोळे मिटत असताना शिरायचे. लहानग्यांचे आणि आपले कपडे जमेल तसे पिळून टाकायचे. मोबाईलवर सकाळी सहाचा गजर लावून झोपायचे. आणि खर्च बराच झाला पण आराम आणि पाहणे खूप झाले, असे म्हणत स्वत:चीच समजूत काढत परत मुंबई गाठायची. दुसऱ्या दिवशी धावपळ सुरू.

खरे पाहता आपल्याला आवश्यकता असते सैलसर व स्वच्छंदी जीवन जगण्याची. काटेकोर धावपळीचा, रोजच्या पोशाखी वागण्याचा आणि रोज आपण खात असलेल्या खाद्यपदार्थांचा कंटाळा घालवण्याची.

थोडा विचार केला तर यातून आपल्याला चांगला मार्ग काढता येईल. आपल्याला आणि मुलांना मनमोकळे व मनसोक्त राहता येईल. घरी असणाऱ्या महिलांनी मुलांचे बाबा सोबत आले तर त्यांच्यासहित किंवा त्यांना जमणार नसले तर त्यांच्याशिवाय, आपल्या समवयस्क मैत्रिणींचा छानछोटा ग्रुप बनवावा. हा गुप तीनचार जणींच्यावर मात्र नसावा. मग कोकणातल्या एखाद्या खेड्यातले घर १५-२० दिवसांसाठी भाड्याने मिळवावे. आसपास थोडी चौकशी केली तर कोकणातल्या कितीतरी गावांमधली अशी घरे उपलब्ध होऊ शकतील. कोकणाचा हा सारा परिसर अत्यंत रम्य तर आहेच पण तो अत्यंत सुरक्षित प्रदेश आहे. कोणत्याही गावात कोणत्याही वेळी तुम्ही बिनघोर राहू शकता. फिरू शकता. या गावांमधले गावकरी काही त्रास तर देणार नाहीतच उलट जमेल तेवढी मदत करतील.

कोकणात आज बऱ्याच सोयी आहेत. तालुक्यांच्या ठिकाणी सुपर माकेर्टपासून-बँकापर्यंत सगळ्या सोयीसुविधा आहेत. सर्व गावांमध्ये पिशवीतून दूध मिळते. बहुतेक गावांमध्ये आता नळपाणी योजना आहेत. तिथे गॅस सिलेंडरही सहज मिळतो. दूरध्वनी सेवा खेडोपाडी पोहोचली आहे. गरज पडल्यास, डॉक्टरही आहेत. पण त्यांची गरजच भासणार नाही. मुंबईहून नेलेली औषधेही न वापरता परत आणावी लागतील.

परीटघडीची बांधिलकी नसल्यामुळे मोकळा-चाकळा वावर व मुलांचे उघड्या अंगाने दिवसभर झाडामाडात हुंदडणे, गुराढोरांचा आणि झाडाझुडपांचा अनोखा प्रेमळ सहवास हे सारे वातावरण मुलांना अनुभवू दे. इन्फेक्शन आणि परीटघडीचे मॅनर्स यांचा मुळीच बाऊ करू नका. सगळ्या भीती विसरून मस्त राहात येईल. मैत्रिणी मैत्रिणी मिळून रोज नवनवीन पदार्थ करून मनसोक्त खाता येतील. अशा वातावरणात मुले न कंटाळता एकमेकांमध्ये मिळून-मिसळून दिवसभर खेळत राहतील. दिवसभर खेळून दमून त्यांना रात्री मस्त झोप येईल. सकाळी उठून ती पाहतील तर एखादी मनीमाऊ त्यांच्या अंथरूणात येऊन झोपलेली असेल. तुम्हीही पहाटे अंगणात येऊन बसलात तर तुम्हाला समाधी लागल्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.

कोकणात जायला आता भरपूर वाहतुकीच्या सोयी सहज उपलब्ध आहेत. रेल्वे आहे, खासगी बस आहेत, एसटी आहेत. आराम बसमधील प्रवासापेक्षा, साध्या एसटीतून अवश्य प्रवास करून बघा. एसटीचे जाळे आता अगदी छोट्या गावांपर्यंत पोहोचले आहे. तसेच, एसटीच्या वेळापत्रकातही खूप नियमितता आली आहे. एसटीतून प्रवास म्हणजे समाजातील सर्व प्रकारच्या लोकांशी प्रत्यक्ष संपर्क. या अशा संपर्काचा अनुभव मुलांना जरूर घेऊ द्यावा. त्यातून त्यांच्या संवेदना अधिक जाग्या होतील. कदाचित्, न दिसलेले जगही त्यांना या प्रवासात दिसण्याची शक्यता आहे.

असे हे मुक्त प्रवासाचे १५-२० दिवस तुम्हाला वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा देतील. तुम्हाला व तुमच्या मुलांना हे निसर्गाच्या सहवासातले अनुभव नक्कीच समृद्ध करतील. तुमच्या माणूसपणाला नवा आराम मिळेल. एकमेकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन, आपसात देवघेव करून, लहानसहान श्रम एकत्रित करून मुलांवर एक वेगळाच संस्कार नकळत झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या राज्यातील एक प्रदेश त्यांना ‘आतून’ दिसेल, हा आणखी एक फायदा. समूहजीवनाचा एक नवा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.

साऱ्या गोष्टी तयार आणि जिथल्या तिथे मिळण्याऐवजी स्वत: आखणी करून अमलात आणण्यातही मजा असते. ती मजा अशा ट्रिपमुळे अनुभवता येईल. मग विचार कसला करताय? जमवा मित्रमैत्रिणी आणि मुलांना घेऊन स्वत: सफरीवर निघा!


रिफ्रेश व्हायचंय?

पद्मश्री राव

वीकएण्डला अनेक जण छोट्या ट्रिप आखत असतात. त्यासाठी मुंबईपासून जवळ असलेल्या ठिकाणांना प्राधान्य दिलं जातं. बरेचदा अशा ट्रिप एखाद्या बीचवर किंवा रिसॉर्टवर काढल्या जातात. पण एखाद्या धरणावर जाण्याचा बेत तुम्ही कधी बनवला आहे का? मुंबईपासून जवळच असलेल्या बदलापूरमध्ये एक सोडून दोन धरणं आहेत. बारवी डॅम आणि चिखळोली डॅम. या दोन्ही धरणांचा परिसर रम्य आणि शांत असल्याने एका दिवसात रिफ्रेश होण्यासाठी इथे जायला काहीच हरकत नाही.

………

दशकभरापूवीर् ठाणे जिल्ह्यातलं देखणं आणि नेटकं गाव म्हणून बदलापूर प्रसिद्ध होतं. आता मात्र बदलापूरने कात टाकून शहरी रूप धारण केलं आहे. बदलापूर, अंबरनाथ ह्मद्ध गावांवर मुंबईचा प्रभाव पडल्यामुळे त्यांचा विकास झपाट्याने झाला. बदलापूर आता शहर बनलं असलं तरी त्याने आपल्या ‘गावपणा’च्या खुणा जपल्या आहेत. स्टेशनपासून आत गेल्यावर हे गाव एकेकाळी किती टुमदार, रमणीय असेल याची साक्ष मिळते. या परिसरात पाहण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत. विशेषत: एक दिवसाच्या सहलीसाठी ही ठिकाणं चांगली आहेत. बदलापूरच्या बारवी डॅमवर हौशी पर्यटकांची बरीच गदीर् दिसते.

बारवी हे उल्हास नदीवर बांधलेलं धरण आहे. इथलं निसर्गसौंदर्य आपल्याला मोहीत करतं. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव धरणावर सगळीचकडे फिरता येत नाही. बारवी डॅमच्या परिसरात अनेक रिसॉर्ट्स आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या निवास-भोजनाची व्यवस्था होतेे. बदलापूर स्टेशनपासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर हा डॅम आहे. हा सारा परिसर घनदाट वृक्षांनी वेढलेला आहे. उल्हास नदीच्या दोन्ही किनाऱ्यांना जोडणारा एक पूल आहे. मात्र इथे पुलाखाली जाण्यास मनाई आहे.

सुट्टी असते तेव्हा अनेक जण एखाद्या बीचवर जाणं पसंत करतात. अलिबागचे सर्वच समुदकिनारे सुट्टीच्या दिवशी गजबजलेले असतात. परंतु थोडा बदल म्हणून एखाद्या वीकएण्डला मुंबईपासून जवळच असलेल्या बारवी डॅमला जायला काही हरकत नाही.

बदलापूरातलं आणखी एक धरण प्रेक्षणीय आहे. ते म्हणजे चिखळोली धरण. बारवी डॅमच्या तुलनेत कमी प्रसिद्ध असलेलं हे धरण बदलापूरच्या पूवेर्ला आहे. बदलापूर स्टेशनपासून सुमार सात ते आठ किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. हे धरण छोटेखानी असलं तरी आजूबाजूचा परिसर मात्र प्रेक्षणीय आहे. बदलापूर स्टेशनपासून थेट रिक्षेनेही इथपर्यंत येता येतं. बारवी डॅम इतकी सुरक्षाव्यवस्था इथे नसली तरी हे धरण तुलनेत कमी धोकादायक आहे. तरीही पर्यटकांनी अगोदर माहिती घेतल्याशिवाय पाण्यात उतरण्याचा धोका पत्करू नये. चिखळोली धरणाचा परिसर अतिशय शांत आहे. इथे जाण्याची खरी मजा पावसाळ्यात आहे. कारण पावसाळामुळे फुललेली इथली हिरवळ भुरळ पाडते. पण पावसाळ्याखेरीज एरव्ही कुठलाही मोसमात चिखळोली धरणाला भेट द्यायला हरकत नाही कारण शांत ठिकाणी थोडा वेळ घालावायची इच्छा असणाऱ्यांना यासारखं दुसरं ठिकाण सापडणार नाही.

बारवी किंवा चिखळोली धरणावर जायचा बेत आखत असल्यास काही गोष्टी ध्यानात ठेवा:

* बारवी डॅमला जाण्यासाठी बदलापूर स्टेशनपासून बससेवा उपलब्ध आहे.

* चिखळोली डॅमला रिक्षाने जात येत असलं तरी रिक्षा परतीसाठी थांबणारी असावी. कारण परत जाण्यासाठी इथे कुठलंही वाहन उपलब्ध नाही.

* स्वत:चं वाहन असल्यास सहलीचा आनंद अधिक मोकळेपणाने लुटता येईल.


ठाणे जिल्ह्यविषयी | Thane Zilla Parishad

ठाणे जिल्ह्यविषयी Thane Zilla Parishad

ठाणे जिल्‍हयाविषयी माहिती
महाराष्‍ट्र राज्‍यातील काही मोजक्‍या औद्योगिकद्ष्ट्या प्रगत जिल्‍हयापैकी ठाणे हा एक कोकण विभागातील उत्‍तरेकडील जिल्‍हा आहे. पूर्वेकडे सहयाद्री पर्वतांच्‍या रांगा तर पश्चिमेकडे अरबी समुद्र , उत्‍तरेस गुजरात राज्‍य तर दक्षिणेला जग प्रसिध्‍द मुंबई शहर अशा या जिल्‍हयाच्‍या चतु:र्सिमा आहेत. जिल्‍हृयाला 112 कि. मी. लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. जिल्‍हयाचे क्षेत्रफळ 9558 चौ. कि. मी. असून ते राज्‍याच्‍या 3.11 टक्‍के आहे. राज्‍यात क्षेत्रफळाच्‍या द्ष्टीने जिल्‍हयाचा 16 वा क्रमांक आहे. जिल्‍हयातील ठाणे, कल्‍याण, उल्‍हासनगर, अंबरनाथ, भिवंडी, वसई व पालघर हे तालुके औद्योगिकद्ष्ट्या विकसित असून, मुंबई शहराच्‍या आधूनिक संस्‍कृतीच्‍या प्रभावाखाली आहेत. तर शहापूर, मुरबाड, वाडा, जव्‍हार, विक्रमगड, मोखाडा, डहाणू व तलासरी या तालुक्‍यांचा प्रदेश डोंगराळ असून आदिवासी वस्‍तीने व्‍यापलेला आहे. जिल्‍हयात जव्‍हार व सूर्यमाळ ही थंड हवेची तर अर्नाळा किल्‍ला, माळशेज व वज्रेश्‍वरी बोर्डी, केळवा ही निसर्गरम्‍य प्रेक्षणीय स्‍थळे पर्यटनासाठी प्रसिध्‍द आहेत. जिल्‍हयातील एकूण गावांची संख्‍या 1890 असून 6 महानगरपालिका व 9 नगरपालिका आहेत. ग्रामीण विकासाच्‍या दृष्‍टीने जिल्‍हयात एकूण 968 ग्रामपंचायती आहेत. ग्रामपंचायतीची एकूण सभासद संख्‍या 7769 इतकी असून 9 नगरपालिकांमधील सभासद संख्‍या 291 आहे. त्‍याचप्रमाणे 6 महानगरपालीकामधील सभासद संख्‍या 535 तर ठाणे जिल्‍हा परिषद सदस्‍य संख्‍या 66 इतकी आहे. जिल्‍हयात शासकीय कर्मचा-यांची संख्‍या 46,498 इतकी असून जिल्‍हा परिषद कर्मचा-यांची संख्‍या 18,283 इतकी आहे. जिल्‍हयातील 9 नगरपालिका आणि 6 महानगरपालिका यातील कर्मचारी संख्‍या अनुक्रमे 3488 व 37471 इतकी आहे. 2001 च्‍या जनगणनेनुसार ठाणे जिल्‍हयाची लोकसंख्‍या 8131849 इतकी आहे. लोकसंख्‍येच्‍या बाबतीत ठाणे जिल्‍हा हा मुंबई जिल्‍हयाच्‍या खालोखाल राज्‍यातील दुस-या क्रमांकाचा मोठा जिल्‍हा आहे. 72.58 टक्‍के नागरी लोकसंख्‍या असलेला ठाणे जिल्‍हा राज्‍यात मुंबई नंतर सर्वाधिक नागरीकरण झालेला जिल्‍हा आहे. राज्‍यात 10 लाखाहून अधिक लोकसंख्‍या असलेली 7 महानगरे असून त्‍यातील 2 महानगरे ठाणे जिल्‍हयातील आहेत. 1991 ते 2001 या दशकात जिल्‍हयाच्‍या लोकसंख्‍येत 54.92 टक्‍के वाढ झाली. ही वाढ राज्‍याच्‍या 22.57 टक्‍के वाढीपेक्षा 2.43 पटीने अधिक आहे. जिल्‍यातील ग्रामिण भागातील दशवार्षिक वाढ 20.12 टक्‍के इतकी होती तर नागरी भागातील दशवार्षिक वाढ 73.95 इतकी होती. नागरी भागातील ही वाढ राज्‍यातील इतर जिल्‍हयांच्‍या तुलनेत सर्वाधिक असल्‍याचे दिसून येते. महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या एकूण क्षेत्रापैकी 3.11 टक्‍के क्षेत्र व्‍यापलेल्‍या ठाणे जिल्‍हयात 2001 च्‍या जनगणनेनुसार राज्‍यातील 8.40 टक्‍के व्‍यक्‍ती राहतात. ठाणे जिल्‍हयातील लोकसंख्‍येची घनता दर चौ. कि. मी. 851 इतकी आहे. तर राज्‍याचे हेच प्रमाण केवळ 315 इतके आहे. 2001 च्‍या जनगणनेनुसार ठाणे जिल्‍हयात दर हजार पुरुषांमध्‍ये स्त्रियांचे प्रमाण 858 इतके आहे. राज्‍याचे हेच प्रमाण 922 इतके आहे. 2001 च्‍या जनगणनेनुसार जिल्‍हयातील अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्‍या अनुक्रमे 4.18 टक्‍के व 14.75 टक्‍के आहे. महाराष्‍ट्र राज्‍यात हे प्रमाण अनुक्रमे 10.20 टक्‍के व 8.85 इतके आहे. जिल्‍हयातील अनुसूचित जातीचे प्रमाण अंबरनाथ तालुक्‍यात सर्वाधिक 8.26 टक्‍के इतके असून अनुसूचित जमातीचे सर्वाधिक प्रमाण मोखाडा तालुक्‍यात 90.56 टक्‍के इतके आहे. अनुसूचित जमातीचे प्रमाण जिल्‍हयातील 7 तालुक्‍यात 50 टक्‍के पेक्षा अधिक आहे. 2001 च्‍या जनगणनेनुसार जिल्‍हयातील एकूण काम करणायांची संख्‍या 31,79,981 असून ते जिल्‍हयातील लोकसंख्‍येच्‍या 39.11 टक्‍के इतके आहे. एकूण काम करणा-यापैकी शेतक-यांची संख्‍या 12.22 टक्‍के, शेतमजूर 9.64 टक्‍के, घरगुती उद्योगधंद्यात गुंतलेले कामगार 2.50 टक्‍के आणि इतर क्षेत्रात काम करणा-याची संख्‍या 75.64 टक्‍के इतकी आहे. एकूण काम करणा-या व्‍यक्‍तीपैकी स्त्रियांचे प्रमाण 23.17 टक्‍के आहे. राज्‍यातील हेच प्रमाण 34.78 टक्‍के इतके आहे. 2001 च्‍या जनगणनेनुसार ठाणे जिल्‍हयातील साक्षरतेचे प्रमाणे 80.67 टक्‍के इतके असून राज्‍यात हेच प्रमाण 76.88 टक्‍के इतके आहे. जिल्‍हयातील ग्रामिण भागातील 64.45 टक्‍के तर नागरी भागात 86.56 टक्‍के व्‍यक्‍ती साक्षर असल्‍याचे दिसून येते. पुरुष व स्त्रिया यांचे जिल्‍हयातील साक्षरतेचे प्रमाण अनुक्रमे 80.00 व 73.10 टक्‍के इतके आहे. जिल्‍हयात प्राथमिक शाळांची संख्‍या 4518 असून त्‍यातील शिक्षकांची संख्‍या 23170 इतकी आहे. जिल्‍हयात प्रती शिक्षक विद्यार्थी संख्‍या 42 इतकी असून राज्‍याचे हेच प्रमाण 36 इतके आहे. जिल्‍हयात माध्‍यमिक आणि उच्‍च माध्‍यमिक शाळांची संख्‍या 956 इतकी असून वरिष्‍ठ महाविद्यालयांची संख्‍या 20 इतकी आहेत. जिल्‍हयात ग्रामिण भागात आरोग्‍य सेवा पुरविण्‍याकरीता 79 प्राथमिक आरोग्‍य केंद्र असून त्‍या अंतर्गत 487 उपकेंद्र आहेत. त्‍याचप्रमाणे कुटीर, ग्रामिण व इतर रुग्‍णालयांची संख्‍या 21 असून अतीदुर्गम भागात आरोग्‍य सेवा पुरविण्‍याकरीता 35 फिरती पथके कार्यरत आहेत.

Dahanu | Thane Zilla Parishad

Dahanu Thane Zilla Parishad

dahanu

Dahanu

Located on the western coastal line of India in Maharashtra, Dahanu is a charming seaside town with a huge sprawling beach. It borders Gujarat State and is surrounded by greenery on three sides and Arabian Sea in the west. The place, an ideal weekend getaway, is famous for its chikoo fruit. Dahanu is the largest manufacturer of balloons in the world.

मनातलं

ग्लोबलायझेशननंतर शहरीकरण झपाट्याने झालं आणि गावांची बकाल शहरं होऊ लागली. कोणत्याही नियोजनाशिवाय विकासाच्या नाव

ाखाली सिमेंटच्या जंगलांनी शेतजमिनींचा बळी जाऊ लागलाय. यावर ना कुणाचं नियंत्रण आहे ना कसले नियम… हे गाव अशा हजारो गावांचं प्रतिनिधित्व करणारं… माती हरवलेलं.

गाव तालुक्याचं नसलं तरी मोठं, बाजारपेठेचं. स्टॅण्डवर उतरून भरून वाहणारा पुणे-नाशिक रस्ता ओलांडला, की आपट्याचं पट्टी शेत. खरं तर बसस्टॅण्डची इमारत उभी राहिली या शेतातच. लांबूनच सीताआत्याचं घर दिसायचं. तिथे जरा टेकून चहापाणी झालं, की मळ्याकडे चालू लागायचं. हा फारतर पंधरावीस मिनिटांचा रस्ता. दोन्ही बाजूला शेतं. दिवाळीला गेलं, की डोक्यापर्यंत आलेली गच्च बाजरी दिसायची. पुढे हरणमुखाची शेतं. जरा हलकी. त्यात कडधान्य पसरलेली. मूग निघालेला असायचा. घरासमोरच्या अंगणात बढेमामा शेंगांचं वाळवण घालून बसलेले दिसायचे. दारातल्या शेळीला चारा टाकत सरसआत्याची ‘आलीस का गं?’ म्हणत जिव्हाळ्याने चौकशी. पुढे खरमाळ्यांची माडी. परिसरातली एकमेव. रंगीत बेल्जिअम काचांच्या त्या खिडक्यांचं लहाणपणी आकर्षण वाटायचं खूप. माडीशेजारी विहीर. भरपूर गोड्या पाण्याची. आजूबाजूच्या सगळ्या बायाबापड्या इथून पाणी भरायच्या. नळाचं पाणी गावापुरतं. इथे अजून ते सुख नव्हतं. सदासर्वकाळ रहाट वाजत राहायचा. तिथे मोट पाहिल्याचंही आठवतंय. त्यांच्या शेतात भाजीपाला, वगैरे. रस्ता आमच्या घरावरून पुढे मुळे वस्तीत जायचा. खाली कडूलिंबाची गच्च झाडं. चुलत्यांची शेतं, विहीर. भरपूर पाणी असलेला ओढा. काठाशी सीताफळांनी गच्च लगडलेली असंख्य झाडं. पायाशी बोरांचा सडा पडलेल्या बोरी. थोरातांची फळबाग. वस्तीपासून थोडं लांब त्यांचं घर…

काळाबरोबर धावताना गाव मागे पडलं तरी हेच चित्र मनावर घट्ट कोरलेलं. सुट्टीत जाणं व्हायचं. प्रत्येक वेळी झालेले बदल जाणवायचे. सगळ्यात आधी आपट्याच्या पट्टीत वडिलांनी घर बांधलं. जवळच बाजारसमितीची इमारत उभी राहिली. हॉटेलं झाली. बार झाले. रस्त्याच्या पलीकडचं गाव रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला वाढू लागलं. हळूहळू शेतातली हिरवाई दिसेनाशी झाली. बाजरीच्या ताटांऐवजी आरसीसीचे पिलर्स दिसू लागले. रस्त्याच्या कडेला शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि थोडं आतल्या बाजूला हाऊसिंग सोसायट्यांची नावं मिरवणाऱ्या इमारतींनी शेतजमीन गिळून टाकली. नवश्रीमंतांच्या बंगल्यांच्या झोकदार कॉलन्या उभ्या राहिल्या. आजूबाजूच्या गावातले नोकरदार, शिक्षक, कामगार कुटुंबकबिल्यासह स्थिरावले. त्यांच्यासाठी अॅस्बेस्टॉसच्या पत्र्याच्या लांबलचक चाळी उभ्या राहिल्या. शेजारच्या तालुक्यातल्या एमआयडीसीत कामगार घेऊन जाणाऱ्या झोकदार बसेस दिसू लागल्या. वाढत्या गरजांना पुरं पडण्यासाठी जमेल तसं, जमेल तिथे गाव वाढू लागलं. घरापासून कॉलेजपर्यंत सुनसान वाटणारा रस्ता आता दोन्ही बाजूंना दिमाखदार इमारती घेऊन नांदता झाला. एकेकाळी गर्द हिरव्या झाडीत लांबूनही सहज ओळखू येणारी कॉलेजची टुमदार इमारत हळूहळू हरवत जाऊन दिसेनाशी झाली.

शेतकरी मात्र खुशालले होते. आधी एकरांवर चाललेली विक्री आता गुंठ्यांवर आली. हजारांत होणारे व्यवहार लाखांत होऊ लागले. रजिस्ट्रारच्या ऑफिसात नंबर लागेना. तुकड्यातुकड्यांनी शेतजमिनीचा बळी पडत राहिला. औत, नांगर दिसेनासे झाले. ज्या घरांत पोत्यांच्या राशी लागत तिथे महिन्याच्या किराण्याच्या यादीत पावशेर मूगही लिहिले जाऊ लागले. गाई गुरं आधीच बाजारात गेली होती. आता गाड्यांच्या शर्यतींच्या हौसेपोटी ठेवलेल्या बैलजोड्या फक्त राहिल्या. खादीच्या पांढऱ्याधोप कपड्यात मनगटावर, गळ्यात सोन्याच्या अवजड साखळ्या ल्यायलेली तरुण पोरं चौकात बाइकवरून उंडारू लागली. एकरभर शेत विकलं की महिंदची चकचकीत एसी गाडी दाराशी झुलू लागली.

चार सहा महिन्यांच्या गॅपने गावी जावं, तर जुन्या खुणा पुसून नवं काही तरी उभं राहिलेलं असायचं. घरापर्यंतच्या रस्त्यावर अनोळखी चेहरे वाढू लागले. मध्यंतरी एक मॉलही उभा राहिला. दहा वर्षांपूवीर् आठ हजार लोकवस्तीचं गाव आता पंचवीस हजारांचा आकडा ओलांडून गेलं. दुसऱ्या राज्यांतून आलेल्या तीन हजार जणांनी तिथे कायमचं बस्तान बांधलंय. चार हजार एकरांवर होणारी शेती दोन हजार एकरावर आलीय. डेवलपर नावाची जमात जोरात आहे. एजण्ट्सचं पिक आलंय.

गाव वाढतंय. सुजल्यासारखं. त्याला कसलं नियोजन नाही, कुणाचं नियंत्रण नाही. दोन इमारतींमधे फूटभर जागाही नाही. कधी काही अघटीत घडलं तर काय, याचा विचार नाही. प्यायला पुरेसं पाणी नाही. पिण्याच्या पाण्यासाठी भुतासारखं पहाटे उठायचं. जमिनीला भोकं पाडून पाण्यासाठी हजारो बोअर घेतलेत. सांडपाणी रस्त्यावर. घोंगावणारे डास, माशा. दर पावसाळ्यात ठरवल्यासारख्या साथी येतात. दवाखाने फुल्ल होतात. डेंग्यू, मलेरिया कायमचे पाहुणे. महामार्गावरचं गाव म्हणून एड्सचं बस्तान. टुमदार गावाचं बकाल शहर होताना असहायपणे बघणं एवढंच हातात उरलंय.

या दिवाळीत गावी गेले होते. पाडव्याचा दिवस. सकाळीच बाहेर पडलेला भाऊ दुपारी उशिरा परत आला. बरीच भूमीपूजनं आणि उद्घाटनं उरकून आलो म्हणाला. या वषीर् गावात तीन हजार नवे फ्लॅट्स तयार होताहेत, तो उत्साहाने सांगत होता. गावपण कधीच हरवलेल्या माझ्या गावाची मग आणखीनच काळजी वाटू लागली.

जगणं घडवायला शहरात गेलेली माणसं मातीच्या ओढीने पुन्हा गावात परततात म्हणे. ज्या गावात मातीच उरली नाही अशा गावाचं आता काय करायचं, हा प्रश्न तेव्हापासून छळतोय….

प्रगती बाणखेले

original at – http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3748370.cms